सोलापूर-मराठवाड्याच्या मायमाऊलींच्या, शेतकरी-कष्टकरी बांधवांच्या वतीने…
प्रिय शंकरभाऊ,
लेकरा…
आज तुला हे पत्र लिहायला बसलेय, पण खरं सांगू, मनात खूप काही साठलंय. काही आठवणी डोळ्यांत पाणी आणतायत, काही प्रसंग काळजाला भिडतायत, तर काही गोष्टी आठवल्या की मन भरून येतंय. आज आमच्या सोलापूर-मराठवाड्याच्या
मायमाऊलींची अवस्था अगदी अशीच झालीय.
आम्ही दुष्काळाशी दोन हात करणारी माणसं. आभाळाकडं डोळं लावून पावसाच्या चार थेंबांची वाट पाहणारी माणसं. कधी शेतात राबायचं, कधी पोटासाठी गाव सोडायचं, तर कधी लेकरांच्या शिक्षणासाठी पुण्या-मुंबईची वाट धरायची. आयुष्यभर कष्ट आमच्या पाचवीला पुजलेले. पण एवढं सगळं सोसूनही आम्ही जगतोय, कारण मनात एक आशा असते की संकटाच्या काळात कुणीतरी आपलं माणूस पाठीशी उभं राहील. आणि लेकरा, आज तू नेमकं तेच केलंस! शिवछत्रपतींची शिकवण आपण लहानपणापासून ऐकत आलोय. राज्य हे रयतेसाठी असतं. सत्ता ही स्वतःच्या मोठेपणासाठी नसते, तर सामान्य माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्यासाठी असते. रयतेच्या दुःखात धावून जाणं, अडचणीच्या काळात तिच्या पाठीशी उभं राहणं, हीच खरी राजधर्माची शिकवण. हीच शिकवण मनात ठेवून तू पिंपरी-चिंचवडमधून आमच्या सोलापूर-मराठवाड्यातल्या शेतकरी-कष्टकरी बांधवांच्या मदतीला धावून आलास. स्वतःच्या घरची दिवाळी बाजूला ठेवून दुसऱ्याच्या घरात चूल पेटती राहावी, लेकरांच्या ताटात दोन घास पडावेत, या भावनेनं तू आमच्यात आलास. खरं सांगू लेकरा, आजकाल मदत करणारी माणसं दिसतात; पण कुणाच्या दुःखाला आपलं दुःख समजून मदतीला धावून येणारी माणसं फार कमी असतात. स्वतःच्या घरात दिवाळी साजरी करण्याआधी दुसऱ्याच्या घरात दिवा लागला पाहिजे, अशी भावना मनात ठेवून येणारी माणसं वेगळीच असतात.
तुझ्या येण्याचं आम्हाला म्हणूनच एवढं कौतुक वाटतंय.
शंकरभाऊ, तुझ्या या मायेची आणखी एक खास आठवण आमच्या मनात आहे. तुझे थोरले बंधू, आमचे लाडके स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचंही आमच्या सोलापूर-मराठवाड्यातील शेतकरी-कष्टकरी बांधवांशी जिव्हाळ्याचं नातं होतं. दुष्काळाच्या काळात त्यांनी अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला होता. आमच्या गावाकडच्या अनेक मायमाऊली त्यांना आपल्या माहेरच्या भावासारखं मानायच्या.
त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आजही आमच्या मनात आहे. मात्र, आज तू त्याच मायेची आणि आपुलकीची परंपरा आपल्या कृतीतून पुढं चालवलीस. मोठ्या भावानं जपलेलं माणुसकीचं नातं तूही तितक्याच आत्मीयतेनं जपतोयस, याचं आम्हाला मनापासून समाधान आहे. कारण लेकरा, खरा वारसा हा मालमत्तेचा किंवा पदाचा नसतो; तो असतो विचारांचा, संस्कारांचा आणि माणसांच्या मनात कमावलेल्या प्रेमाचा! बहात्तरच्या दुष्काळापासून आणि त्याच्याही आधीपासून आमच्या गावाकडची अनेक माणसं पोटासाठी पुण्या-मुंबईला गेली. कुणी बांधकामावर राबलं, कुणी कारखान्यात घाम गाळला, कुणी नोकरी केली, तर कुणी छोटा-मोठा व्यवसाय उभा केला. आमच्या या लेकरांनी गाव सोडलं, पण गावाशी असलेली नाळ कधी तोडली नाही.
पुण्या-मुंबईत गेलेल्या आमच्या पिढ्यांना जगताप कुटुंबानं नेहमी आपुलकीनं जवळ केलं. आमच्या कष्टांची, कर्तृत्वाची किंमत ओळखली. अडचणीच्या वेळी आधार दिला आणि परक्या शहरातही आम्हाला आपलेपणाची जाणीव करून दिली.
आज तू या नात्याचं आणखी एक सुंदर उदाहरण घालून दिलंस. केवळ पुण्या-मुंबईत राहणाऱ्या आमच्या माणसांची काळजी न घेता त्यांच्या गावाकडच्या आई-वडिलांची, भावाबहिणींची, शेतकऱ्यांची आणि कष्टकरी कुटुंबांचीही काळजी घेतलीस.
जेव्हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीची मोहीम राबवण्याचं ठरलं, त्यावेळी तू स्पष्ट सांगितलं की या मोहिमेची सुरुवात बार्शीपासून करा.बार्शी अशी मधल्यामध्ये अडकलेली. दुष्काळाचे चटके मराठवाड्यासारखे सोसायचे; पण प्रशासकीय वर्गवारीत मात्र पश्चिम महाराष्ट्रात मोजलं जायचं! त्यामुळे मदतीच्या वेळी कधी इकडं तर कधी तिकडं, अशी आमची अवस्था व्हायची. पण लेकरा, आमच्या या वेदनेची जाणीव तू ठेवलीस. सोलापूर-मराठवाड्याला मामाचं गाव मानून तू मदतीची सुरुवात इथून केलीस. आणखी एक गोष्ट मनाला भिडली, ती म्हणजे तू केवळ दिवाळीपुरतं धान्य देण्याचा विचार केला नाहीस, तर शेतकरी-कष्टकरी कुटुंबांच्या घरात महिनाभर चूल पेटती राहावी, यासाठी पूर्ण रेशन देण्याचा निर्णय घेतलास.
दिवाळीला नवीन कपडे नसले तरी चालतील, घराला रंग नसला तरी चालेल; पण घरातल्या डब्यात धान्य असावं आणि लेकरांच्या ताटात दोन घास पडावेत, एवढीच तर आमच्या गरीब माणसांची अपेक्षा असते. तू नेमकी तीच काळजी घेतलीस.
पुण्यातील सोलापूर-मराठवाडा मेळाव्यात तू एक खंत व्यक्त केली होतीस. आमचे पाहुणे बहुतांश पुणे जिल्ह्यातले असल्यामुळे दिवाळीत आम्हाला गावाकडं जाण्याचा आनंद मिळत नाही, असं तू म्हणाला होतास. तुझे ते शब्द आम्ही ऐकले होते.
पण यंदा लेकरा, तू आमचं गावच तुझं मामाचं गाव मानलंस!
आपल्याकडं मामा दिवाळीला भाच्याच्या घरी येतो, ही जुनी परंपरा. पण तू तर मामाच्या घरी येण्यापुरता थांबला नाहीस. स्वतःच्या घरची दिवाळी बाजूला ठेवून मामाच्या गावातल्या प्रत्येक घराची दिवाळी गोड करण्यासाठी आलास. मामा एकट्या बहिणीला ओवाळणी देत नाही, तर त्याच्या घरातल्या सगळ्यांची काळजी करतो. तशीच तू आमच्या संपूर्ण गावाची काळजी घेतलीस.
खरंच लेकरा, याला म्हणतात नातं! रक्ताचं नसलं तरी मनानं जोडलेलं नातं. आणि मनानं जोडलेली नाती कधीच तुटत नसतात.
आज आमच्या मायमाऊली भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणीचं ताट सजवतील, तेव्हा त्यांच्या मनात तुझ्याविषयी भावाच्या मायेची भावना असेल. लेकरा, आज आम्ही तुला एक गोष्ट विचारू इच्छितो. तू आमच्या घरची काळजी घेतलीस, आमच्या पोटाची काळजी घेतलीस, आमच्या गावाची आणि तालुक्याची काळजी घेतलीस. पण या रुक्ष, दुष्काळी मातीच्या शेतकऱ्याकडे तुला देण्यासाठी आहे तरी काय? ना आमच्याकडं सोन्याच्या ताटातलं जेवण आहे, ना मोठमोठ्या भेटवस्तू आहेत. आमच्याकडं आहे ती कष्टानं रापलेली हातं, काळजात साठवलेली माया आणि देवापुढं जोडले जाणारे दोन हात!
आमच्या शेतकऱ्याच्या हाताला भेगा पडल्या असतील, अंगावर उन्हानं काळपटपणा आला असेल; पण त्याच्या मनातली माणुसकी अजून जिवंत आहे. तो जेव्हा कुणासाठी आशीर्वाद देतो, तेव्हा तो अगदी काळजाच्या तळातून देतो.
म्हणून आज आमच्या गावोगावच्या आया, बहिणी, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधव तुझ्यासाठी एकच प्रार्थना करताहेत… “देवा, या देणाऱ्याचे हात कायम बळकट ठेव! दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचं मन कळवळतं, त्या माणसाच्या आयुष्यात दुःखाची सावलीही पडू देऊ नकोस. त्याला उत्तम आरोग्य दे, दीर्घायुष्य दे. त्याच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे. आणि तो ज्या क्षेत्रात काम करेल, त्या प्रत्येक क्षेत्रात त्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचव!”
शंकरभाऊ, आज तुम्ही आम्हाला धान्य दिलंत, मदतीचा हात दिलात; पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आम्ही एकटे नाही, आमच्या दुःखात सहभागी होणारं कुणीतरी आपलं आहे, हा विश्वास दिलात. आणि लेकरा, माणसाला जगण्यासाठी अन्नाइतकाच विश्वासही लागतो!
आज तुमच्या या मदतीची किंमत फक्त रेशनच्या पिशव्यांमध्ये मोजता येणार नाही. कारण त्या प्रत्येक पिशवीसोबत एका शेतकरी कुटुंबाच्या घरात आनंद पोहोचलाय, एका आईच्या मनावरचं ओझं हलकं झालंय, एका बापाची चिंता कमी झालीय आणि एका लेकराच्या चेहऱ्यावर हसू आलंय.
उद्या काळ बदलेल, पाऊस येईल, शेतं हिरवीगार होतील, पुन्हा आमच्या बांधावर सोन्यासारखी पिकं डोलतील. आमच्या घरातही सुखाचे दिवस येतील. पण आजच्या या अडचणीच्या काळात तू आमच्या पाठीशी उभा राहिलास, ही गोष्ट आम्ही कधीही विसरणार नाही.
आजपासून दिवाळीच्या प्रत्येक पणतीसोबत तुझ्या या माणुसकीची ज्योत आमच्या मनात तेवत राहील.
आमच्या गावाकडची माणसं अशीच असतात लेकरा. मदत लहान असो वा मोठी, ती मनापासून लक्षात ठेवतात. आज तू आमच्यासाठी धावून आलास, ही मायेची परतफेड आम्ही पैशानं करू शकणार नाही; पण तुझ्या सुख-दुःखात आम्हीही आपुलकीनं तुझ्या पाठीशी उभे राहू, ही आमच्या मातीची रीत आहे.
शेवटी एवढंच सांगायचंय लेकरा…
राजकारणात पदं येतील, जातील. सत्ता येईल, जाईल. माणसाची ओळख त्याच्या पदानं काही काळ होते; पण त्यानं केलेल्या माणुसकीच्या कामानं ती पिढ्यान् पिढ्या टिकून राहते.
तू आज आमच्या घरात दिवाळीचा आनंद घेऊन आलास. आमच्या माणसांच्या मनात आपलेपणाची पणती लावलीस. तुझ्या या मायेचं ऋण आम्ही शब्दांनी फेडू शकणार नाही.
आमच्या सोलापूर-मराठवाड्याच्या मायमातीचा तुला भरभरून आशीर्वाद!
असाच माणसांच्या सुख-दुःखात धावून येत राहा. तुझ्या हातून अशीच जनसेवा घडत राहो. तुझं कुटुंब सुखी राहो. तुझ्या हातून विचारांचा आणि जनसेवेचा वारसा असाच फुलत राहो. तुझ्या आयुष्याची वाट नेहमी यशानं उजळलेली राहो.
आणि हो लेकरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव…
आम्ही तुला फक्त मदत करणारा आमदार म्हणून पाहत नाही; तर आमच्या दुःखात धावून येणारा, आमच्या मायमाऊलींचा भाऊ आणि लेकरांचा मामा म्हणून पाहतो!
तुझ्या येण्याची वाट पाहणारी,
तुझ्या माणुसकीनं भारावलेली…
तुझीच,
सोलापूर-मराठवाड्याची मायमाती!
समस्त माता-भगिनी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी बांधव आणि सोलापूर-मराठवाड्यातील जनतेच्या वतीने…
शब्दांकन- अमोल पाटील
