अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीच्या शिरपेचात  आणखी एक मानाचा तुरा

अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीच्या शिरपेचात  आणखी एक मानाचा तुरा

अनिकेत जाधवचा सुवर्णवेध; लंडन येथे 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक

मुळशी,२८ सप्टेंबर: मेहनत, शिस्त, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कुस्तीच्या मैदानात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा झेंडा उंचावण्याची कामगिरी अनिकेत जाधव यांनी केली आहे. United World Wrestling Senior Championship, London येथे झालेल्या स्पर्धेत 80 किलो वजनी गटात अनिकेत जाधव यांनी सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.

  अनिकेत जाधव हे अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीचे कुस्तीपटू असून, त्यांच्या या यशामुळे अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश केवळ अनिकेत यांच्या वैयक्तिक मेहनतीचे फलित नसून, त्यांना सातत्याने मिळालेले प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कुस्तीविषयक संस्कार यांचेही प्रतिबिंब मानले जात आहे.

  अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील युवा कुस्तीपटूंना दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सुरू आहे. या प्रशिक्षणातून घडणाऱ्या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडणे ही अकॅडमीसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरत आहे. अनिकेत जाधव यांच्या सुवर्णपदकामुळे युवा कुस्तीपटूंनाही मोठी प्रेरणा मिळाली असून, कुस्तीमध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचा मेळ किती महत्त्वाचा आहे, याचे हे उदाहरण ठरले आहे.

  अनिकेत जाधव यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अमोल बुचडे कुस्ती अकॅडमीचे प्रशिक्षक, मार्गदर्शक, कुटुंबीय आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही अनिकेत यांनी देशासाठी आणखी मोठी कामगिरी करावी आणि अकॅडमीमधून असेच अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनिकेतचे वडील प्रकाश जाधव हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते असून एक उत्कृष्ट मल्ल म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच अनिकेत हा विकीलीचे शिक्षण घेत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *