प्रतिनिधी कोण होणार? नेरेचा की मारुंजीचा?

प्रतिनिधी कोण होणार? नेरेचा की मारुंजीचा?

दहा सदस्य नेरेचे, दोन सदस्य मारुंजीचे; आजच्या निवडीकडे दोन्ही गावांचे लक्ष

मुळशी, 17 सप्टेंबर : श्री संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नेरे मारुंजी परिसरातील प्रतिनिधी निवडीचा आज महत्त्वाचा दिवस असून, प्रतिनिधी कोण होणार आणि प्रतिनिधित्व नेरेचे की मारुंजीचे? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

उपलब्ध माहितीनुसार संबंधित १२ सदस्यांपैकी १० सदस्य नेरे गावातील, तर २ सदस्य मारुंजी येथील आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने नेरे गावाचे पारडे स्पष्टपणे जड आहे. अशा परिस्थितीत प्रतिनिधित्व नेरे गावाला मिळावे, अशी अपेक्षा नेरेच्या ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

यापूर्वी माण येथे पांडुरंग ओझरकर यांची बिनविरोध निवड, तर हिंजवडी येथे ५–५ अशी मतांची बरोबरी झाल्यानंतर चिठ्ठीद्वारे निर्णय झाला होता. त्यामुळे आता नेरे–मारुंजीच्या निवडीचा निकाल कसा लागतो, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दहा सदस्य असलेल्या नेरे गावाकडे प्रतिनिधित्व जाणार की दोन सदस्य असलेल्या मारुंजीकडे? की या दोन्ही समीकरणांना बाजूला सारत संचालक मंडळा व्यतिरिक्त सभासदांमधून तिसरेच नाव पुढे येणार? याचे उत्तर आज मिळणार आहे.

    नेरे गावातील ग्रामस्थांच्या दृष्टीने हा केवळ प्रतिनिधी निवडीचा विषय नसून आपल्या गावाच्या प्रतिनिधित्वाचा आणि हक्काच्या सहभागाचा प्रश्न आहे. त्यामुळे नेरे गावाचा प्रतिनिधी निवडला जावा, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

  आता संख्याबळ, सभासदांचा कौल आणि सर्वमान्यता यापैकी नेमका कोणता मुद्दा निर्णायक ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या निवडीत प्रतिनिधी नेरेचा होणार की मारुंजीचा? याचा फैसला काही तासांत स्पष्ट होणार आहे.

श्री संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नेरे मारुंजीवर प्रकाश हरीभाऊ बुचडे, धनंजय मगन जाधव, राहुल सिताराम जाधव, माणिक ज्ञानोबा शिंदे, नागेश कचरनाथ जाधव, तुकाराम वामन जाधव, राजाराम कुंडलिक पपायगुडे, सागर शिवाजी जाधव,अश्विनी दत्तात्रय गाढवे, शोभा बबन जाधव, राजकुमार बबन कदम आणि हबाजी गेनू गायकवाड यांचा समावेश असल्याचे यादीवरून दिसून येते.त्यामध्ये प्रकाश बुचडे आणि राजकुमार कदम हे मारुंजी तर उर्वरित नेरेचे आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *