लांडेवाडी चौकात शूरवीर जिवाजी महाले जयंती उत्साहात साजरी!

स्वराज्य फिल्म प्रोडक्शनच्या शिवकालीन सादरीकरणाने वेधले लक्ष; जिवाजी महाले यांच्या प्रतापगडावरील स्मारकाची मागणी

पिंपरी,११ ऑक्टोबर: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भोसरी येथील लांडेवाडी चौकात शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवकालीन इतिहासातील निष्ठा, शौर्य आणि स्वराज्याप्रती असलेल्या समर्पणाची आठवण करून देणाऱ्या या सोहळ्याला समाजबांधवांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वराज्य फिल्म प्रोडक्शनच्या टीमने सादर केलेल्या शिवकालीन वेशभूषा आणि ऐतिहासिक सादरीकरणाने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

कार्यक्रमाला पुणे जिल्हा अध्यक्ष अशोकराव मगर, पिंपरी-चिंचवड शहर महिला शहराध्यक्ष रूपालीताई गोरे, श्री संत सेना महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष पुंडलिक शेंगदाणे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश पावडे सर आणि पुणे शहर नाभिक युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा कोषाध्यक्ष तानाजी वाळुंजकर यांनी केले. त्यांनी ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ या ऐतिहासिक प्रसंगाच्या माध्यमातून शूरवीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची माहिती प्रभावीपणे मांडली. त्यानंतर पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब यादव आणि पुंडलिक शेंगदाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रतापगडाच्या पायथ्याशी जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा मान मिळाल्याबद्दल अशोकराव मगर यांनी समाधान व्यक्त केले. आयोजकांच्या नियोजनाचे कौतुक करताना त्यांनी जिवाजी महाले यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव केला. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ या इतिहासाची साक्ष देणाऱ्या शूरवीर जिवाजी महाले यांचे प्रतापगडाच्या पायथ्याशी शासनाने लवकरात लवकर स्मारक उभारावे, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली.

शिवकालीन वेशभूषेतील सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने

स्वराज्य फिल्म प्रोडक्शनचे संस्थापक अध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड शहराचे सोशल मीडिया प्रमुख गिरीश राजूरकर सर, कु. अमृता गोरे आणि त्यांच्या टीमने केलेले सादरीकरण कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरले. गिरीश राजूरकर यांनी शूरवीर जिवाजी महाले यांची वेशभूषा परिधान केली होती, तर टीममधील सदस्य शिवकालीन मावळ्यांच्या वेशात सहभागी झाले होते. त्यांच्या भव्य प्रवेशाने आणि ऐतिहासिक सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

मान्यवरांची मोठी उपस्थिती

या सोहळ्याला पुणे जिल्हा उपाध्यक्ष संपत ताटे, मुरलीधर रायकर, राज्य कार्यकारिणी सदस्य अंकुश जाधव, पुणे जिल्हा सरचिटणीस तेजस पंडित, जिल्हा सचिव नितीन कुटे, जिल्हा संघटक संतोष गोरे, गजानन वासिमकर, श्रीहरी जाधव, अनिल कारेकर, अशोक पंडित, पिंपरी-चिंचवड शहर सचिव मनोज विळस्कर, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समिती सदस्य नितीनराजे सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते नारायण शेळके आणि संजय शिंदे उपस्थित होते.

भोसरी विभागीय अध्यक्ष गणेश भोंडेकर, भोसरी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आबा महाले, नारायण वखारे, श्री संत सेना महाराज मंदिराचे विश्वस्त नागेश भोपलकर, रमेश गांगुर्डे, हरिभाऊ शेळके तसेच पिंपरी-चिंचवड शहर संघटक राहुल जगताप यांनीही उपस्थिती लावली.

महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शहर महिला कोषाध्यक्ष वनिताताई कारेकर, शहर महिला कार्याध्यक्ष पूनमताई वाळुंजकर, माजी महिला अध्यक्ष शुभदाताई राऊत, शहर महिला संघटक निकिताताई विळस्कर, शिल्पाताई शिंदे आणि राधिकाताई भोंडेकर यांच्यासह समाजातील माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाच्या शेवटी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधवांचे आभार मानले. शूरवीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाचे स्मरण, ऐतिहासिक वारशाचा जागर आणि समाजातील एकजूट अधोरेखित करणारा हा जयंती सोहळा उत्साहात पार पडला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *