मुळशी तालुका दुष्काळग्रस्त यादीत घ्या

मुळशी तालुका दुष्काळग्रस्त यादीत घ्या

आमदार शंकर मांडेकर यांची कृषी आयुक्तांकडे मागणी

मुळशी,२९ सप्टेंबर: सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने मुळशी तालुक्यातील भात पिकासह अन्य पिकांवर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  मुळशी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर काही दिवस पाऊस झाल्यानंतर पुन्हा दीर्घकाळ पावसाने खंड दिल्याने भात पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही भागात भातपिकावर वाळू लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे.

यंदाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केवळ सरासरी पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर निर्णय न घेता मुळशी तालुक्यातील प्रत्यक्ष पर्जन्यमान, पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी मांडेकर यांनी केली आहे.

  महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळशी तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करावा आणि त्यानंतर मुळशीचा दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याबाबत शासनाने सकारात्मक व तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी निवेदनातून मांडली आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदावरील आकडेवारीतून नव्हे, तर प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीतून समजून घेणे गरजेचे आहे, या भूमिकेतून आमदार मांडेकर यांनी हा प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मांडला आहे.

मुळशीच्या शेतीसमोरील निर्माण झालेली संभाव्य आर्थिक अडचण लक्षात घेता प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळण्यासाठी पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा या मागणीमुळे व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *