पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपाची व्यूहरचना; विजयासाठी महेश लांडगेंनी कसली कंबर!

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपाची व्यूहरचना; विजयासाठी महेश लांडगेंनी कसली कंबर!

बूथनिहाय नियोजन, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक ताकदीवर भर; पाचही जागा जिंकण्याचा भाजपाचा निर्धार

पिंपरी-चिंचवड | दि. १६ ऑक्टोबर २०२६

आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, प्रभारी आणि कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पार पडली. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी संघटनात्मक ताकद, बूथनिहाय जबाबदाऱ्यांचे नियोजन आणि मतदारांशी थेट संपर्क या त्रिसूत्रीवर भर देत लांडगे यांनी कार्यकर्त्यांना विजयासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मितादेवी योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला गती देण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपापली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, मतदारांपर्यंत सातत्याने पोहोचावे आणि बूथस्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या.

पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि अडचणी समजून घेत त्यांच्याशी सातत्यपूर्ण संवाद साधण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. केवळ प्रचारापुरता संपर्क न ठेवता मतदारांच्या प्रश्नांना प्राधान्य देत संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची मते मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

राज्यातील पाचही जागा जिंकण्याचे लक्ष्य!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली पुण्यासह राज्यातील पाचही जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प भाजपाने केला असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले. संघटनेची ताकद, कार्यकर्त्यांची मेहनत आणि नियोजनबद्ध प्रचाराच्या जोरावर हा संकल्प पूर्ण करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“शिक्षक आणि पदवीधर हे समाजाच्या प्रगतीला दिशा देणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या अपेक्षा आणि प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी सातत्याने संवाद साधणे, ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली पुण्यासह राज्यातील पाचही जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर हा संकल्प साकार होईल, असा विश्वास आहे,” असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नोंदणीकृत पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठीही पक्षाच्या वतीने जनजागृती आणि संपर्कावर भर देण्यात येत आहे.

एकीकडे उमेदवारांचा प्रचार, तर दुसरीकडे बूथनिहाय यंत्रणेची बांधणी आणि मतदारांशी संवाद अशा पद्धतीने भाजपाने निवडणुकीची तयारी वेगवान केली आहे. आता या नियोजनाचे मतांमध्ये किती रूपांतर होते आणि पुणे विभागात भाजप-महायुतीला कितपत यश मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *