भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोने लुटले!; तिघांना अटक

तळवडेतील धाडसी चोरीचा चिखली पोलिसांकडून उलगडा; ७३ तोळे सोन्यासह ५७.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड, दि. १९ –  झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी भंगार गोदामात चोरी करण्यासाठी निघालेल्या तिघांनी संपूर्ण प्लॅन बदलून तळवडे येथील एका बंगल्यावर डल्ला मारला. घरात झोपलेल्या महिलेचे हात-पाय व तोंड बांधून चोरट्यांनी तब्बल ६८ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य ऐवजासह एकूण ५३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मात्र, चिखली पोलिसांनी ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत या चोरीचा छडा लावला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७३ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ५७ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनारुल्ला मजहर उल्ला चौधरी (वय ३६, चिखली), अब्दुल रहिम मजिद मोमीन (वय ३९, कांदिवली, मुंबई) आणि समिउल्ला अजमतउल्ला खान (वय ३२, मुंब्रा, ठाणे) अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनारुल्ला चौधरी हा चहाच्या टपरीवर काम करत होता. कौटुंबिक वादातून घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपल्या दोन साथीदारांना पिंपरी-चिंचवडमध्ये बोलावून घेतले. तिघांनी कुदळवाडी येथील एका भंगार गोदामात चोरी करण्याचे नियोजन केले. त्यानुसार ते गोदामाच्या शोधात निघाले होते. मात्र, तळवडे येथे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले असताना त्यांना भारती भालेकर यांच्या मालकीच्या जागेची माहिती मिळाली. हॉटेलचालकाकडे चौकशी केल्यानंतर आरोपींनी हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या बंगल्याची पाहणी केली. परिसरातील परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्यांनी भंगार गोदामातील चोरीचा बेत रद्द करून थेट बंगलाच फोडण्याचा निर्णय घेतला.

बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आरोपींनी मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाचा वापर केला. १३ ऑक्टोबर रोजी पहाटे एकच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणाहून बंगल्याच्या टेरेसवर प्रवेश करून ते पहिल्या मजल्यावरील खोलीत पोहोचले. त्या वेळी घरात झोपलेल्या भारती भालेकर यांचे हात-पाय आणि तोंड बांधून त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. यामध्ये ४८ लाख २५ हजार रुपये किमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिने, पाच लाख रुपये रोख, ३० हजार रुपयांचे चांदीचे दागिने, दहा हजार रुपयांचा मोबाईल आणि पाच हजार रुपयांचे घड्याळ, असा एकूण ५३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिखली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि त्यांच्या पथकाने परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवून प्रथम अनारुल्ला चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अब्दुल रहिम मोमीन आणि समिउल्ला खान यांनाही अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी ७३ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या पैंजणांच्या तीन जोड्या, दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा एकूण ५७ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंगार गोदामात चोरी करण्याच्या इराद्याने निघालेल्या आरोपींनी बंगल्यातील सोन्यावर डल्ला मारला; मात्र सीसीटीव्हीच्या आधारे चिखली पोलिसांनी त्यांचा माग काढत या धाडसी चोरीचा उलगडा केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *