– विद्यावाचस्पती विद्यानंद
Mobile: +917709612655
Email: vidyavachaspati.vidyanand@gmail.com
समाज माध्यमांव्दारे आपली व्यक्तिगत स्वरूपातील कोणती माहिती किती द्यायची ह्याची सतत जाणीव होणे आवश्यक असते. अनेकदा आपले लोकेशन फेसबुकवर जाहीर केले जाते, आपण परगावी गेल्याच्या संदर्भातील पोस्टमुळे ही माहिती जगजाहीर होते आणि त्यामुळे अशा ठिकाणी घरफोड्या होतात.
अलीकडच्या काही काळापासून अनेकांना आभासी दुनियेचे प्रचंड आकर्षण वाटू लागले आहे. समाज माध्यमांच्याइतका विश्वास इतरांवर तर लांबच परंतू स्वतःवर देखील ठेवला जात नाही. अनेकदा सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेला त्रास, मनस्ताप, दु:ख, नुकसान, फसवणूक आणि कालांतराने पश्चाताप भोगण्याची वेळ अनेकांवर येत असल्याचे आपण सर्वच ऐकत आहोत. सोशल मिडीयाच्या आहारी जाण्यामुळे आणि फसगत झाल्यामुळे सोशल मिडिया आपल्याला सोसत नाही, हे अभ्यासपूर्वक समजून घेण्याची गरज असते. गुगल काहीवेळा गुगली टाकत असते, हे लक्षातच घेतले जात नाही. सोशल मिडिया, गुगल, विविध वेबसाईट अनेकदा आपल्याला अत्यंत योग्य, चांगली, गरजेची, आवश्यक माहिती पुरवतात, परंतू नेहमीच तसे घडेल असेही नाही. अनेकांना गुगलवर एखादा पत्ता शोधताना मनस्ताप झाल्याचे अनुभवायला येत असते, समाज माध्यमांव्दारे केल्या जाणाऱ्या खोट्यानाट्या जाहिरातींना भुलून आजवर अनेकांची आर्थिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या फसवणूक होत आहे. काही व्यावसायिक वेबसाईटच्या माध्यमातून खोटे आर्थिक व्यवहार करून, बँक खात्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे ती खातेदाराकडून लबाडीने मिळवून नकळत आर्थिक फसवणूक केली जात असल्याचेही आपण ऐकत आहोत. अर्थात, ह्या अभासी दुनियेत सहभागी व्हायला काहीच हरकत नाही, परंतू प्रथमतः त्याची सविस्तर माहिती करून घेऊन, सखोल अभ्यास करून आणि योग्य दक्षता बाळगून मगच सावधपणे विचार, वर्तन आणि व्यवहार करणे हिताचे ठरते.