स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या मुळशी आणि मावळ खोऱ्यात अनेक गडकोट ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. काळाच्या ओघात ऊन, वारा पावसाशी व मानवी संकटाशी सामना देत हे गडकोट स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. अलीकडील काळात या गडकोटांवरील वाढता मानवी वावर आणि लालफितीत अडकलेला शासनाच्या संबंधित विभागाचा कारभार यामुळे यातील काही गडकोट व त्याचे अवशेष शेवटच्या घटका मोजताना दिसत आहेत ही चिंतेची बाब आहे. या गड कोटांवर मनापासून प्रेम करणाऱ्या मावळ्यांनी हे गडकोट व त्यांचे अवशेष पुढील पिढीसाठी टिकले पाहिजेत. इतिहासाची व मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या हे गडकोटच नामशेष झाले तर नव्या पिढीला हा पराक्रमाचा इतिहास उमजणार कसा ?
ही चिंतेची बाब लक्षात घेवून काही समविचारी मावळे त्या त्या भागात वेगवेगळ्या संघटना, संस्था व समूह तयार करून शासनाच्या नियमाच्या अधीन राहून दुर्ग संवर्धनाचे अनमोल कार्य करताना दिसत आहेत. त्यातील एक संस्था म्हणजे श्री. शिवदुर्ग संर्वधन संस्था होय. या संस्थेशी जोडलेले अनेक मावळे आपला वेळ, पैसा व कौशल्य पणाला लावून गडकोटाचे संवर्धन कार्य करताना दिसतात. छत्रपती शिवप्रभूच्या कार्याला आपले जीवनच समर्पित केलेले डॉ. श्री. संदीपजी महिंद गुरुजी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने प्रभावित होऊन सन २००८ सालापासून मुळशी व मावळ मधील काही मावळे देखील या शिवकार्याशी जोडले गेले आहेत. या मावळ्यांनी श्री. शिवदुर्ग संवर्धन संस्था व अन्य सहकारी संस्थांच्या माध्यमाने मुळशी आणि मावळ तालुक्याच्या सीमेवर असलेले तुंग आणि तिकोना या गडांचे पालकत्व घेवून येथील शिवकार्यात झोकून दिले आहे. यामध्ये शिवप्रेमी व गडप्रेमी सागर शिंदे, विजय खैरे, आकाश मारणे व सुमित मोहोळ या मावळ्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. ऐन उमेदीच्या काळात स्वतःचं शिक्षण, नौकरी व व्यवसाय यांतून करिअर घडविण्यासाठी झगडत असतानाच शिवकार्यालाही तितकाच न्याय देण्यासाठी धडपड करणाऱ्या या मावळ्यांच करावं तेवढ कौतुक कमीच आहे.
सन २००८ साली श्री. संदीप महिंद गुरुजीनी रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन केले त्यावेळी मुळशीतील एक मावळा श्री. समीर बोडके यांच्या परिचयातील बरेचजण या मोहिमेत सहभागी झाले होते. याच मोहिमेत व्यावसायिक तरुण असलेले सागर शिंदे सहभागी झाले होते. रायगडाचा पावन स्पर्श आणि दर्शन तसेच श्री. संदीप महिंद यांच्या वाणीने प्रभावित होऊन ते शिवकार्याशी कायमचे जोडले गेले. सातत्याने श्री. संदीप महिंद गुरुजींचा लाभणारा सहवास व मार्गदर्शन यामुळे पुढील काळात सागर शिंदे यांच्याबरोबरच विजय खैरे, सुमित मोहोळ, आकाश मारणे ही मंडळीही शिवकार्यात कायमची जोडली गेली. त्यातूनच त्यांचा विविध मोहिमा, कार्यक्रम, श्री. शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमाने सुरु असलेले गड संवर्धन कार्य यात सक्रीय सहभाग सुरु झाला.
यामध्ये सुरुवातीच्या काळात संदीप महिंद यांच्या नेतृत्वाखाली निघालेली पुणे ते पानिपत ही दुचाकीस्वारांची मोहीम. दरवर्षी हिंदू साम्राज्य दिनानिमित्त रायगडावरचं मावळ्याचं एकत्रीकरण असो कि तुंग आणि तिकोना गडावर सातत्याने सुरु असलेले संवर्धन कार्य असो या करिता हे तरुण कायम अग्रेसर असतात. नवीन कार्यकर्त्यांना गडांच्या दर्शनासाठी घेवून जाणे, दिवाळीच्या निमित्ताने किल्ले बनविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करणे, गडकोटांच्या प्रदर्शनीचे आयोजन, तिकोना गडावरील रामनवमीचा उत्सव साजरा करणे या कार्यात हे मावळे जीव ओतून काम करताना दिसतात. परिणामी या कार्याची दखल घेवून शासनाच्या पुरातत्व विभागाने तिकोना, बहादूरगडाच्या डागडुजीसाठी मोठ्या निधी उपलब्ध करून संवर्धन कार्य सुरु केले आहे. तसेच सतत आयोजित केल्या जाणा-या विविध मोहिमा, कार्यक्रम विविध प्रसंगी आयोजित केली जाणारी व्याख्याने यामुळे प्रेरित होऊन युवक वर्ग मोठ्या प्रमाणात शिवकार्यास जोडला जात आहे.
समर्पित भावनेने गडसंवर्धनाचे कार्य हाती घेतलेल्या या मावळ्यांचा हातून अखंडपणे असेच राष्ट्रकार्य घड़ीही आई जगदंबेला प्रार्थना.
शब्दांकन प्रदीप पाटील, (पत्रकार)