‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन |
शब्द वाटू धन जनलोका ||२||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
शब्दचि गौरव पूजा करु ॥३॥ ‘
या उक्तीप्रमाणे रोखठोकने लेखनी आणि शब्दांच्या आधारे प्रसिद्धी माध्यमात कायम अग्रेसर राहून वृत्तांकन सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. रोखठोकच्या या वृतांकन कामामुळे समाजात सकारात्मक बदल होण्यास नक्कीच मदत झाली आहे. याची आम्हास निश्चित खात्री आहे. ही विश्वासार्हता जपण्याचे काम रोखठोकने मागील अकरा वर्षांपासून निरंतर केले आहे, याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. वाचक, दर्शक आणि जाहिरातदार यांनी दिलेले प्रेम आणि दाखवलेला विश्वास याच्याच बळावर रोखठोक आता अकरा वर्षाचं झालं आहे. बदलत्या काळानुसार आणि मागणीनुसार रोखठोकने माध्यम क्षेत्रात सतत स्वतःमध्ये बदल घडवून घेत साऱ्या प्रवासात या क्षेत्रातील आपलं वेगळं स्थान कायम ठेवलं आहे.
या वाटचालीत पत्रकारीतेचा वसा आणि वारसा जपत असताना ‘शब्दांची धार आणि लेखणीचा प्रहार’ हे ब्रीद डोळ्यासमोर कायम ठेवून प्रसिद्धी माध्यम म्हणून आपले कर्तव्य पार पाडीत आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने वाचकांच्या मत भिन्नतेनुसार त्यात काही कमी जास्त झालं आहे असं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पत्रकारितेचा धर्म पाळत असताना चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर असा न्याय प्रसिद्धीमाध्यमाकडून दिला जावा हा स्वाभाविक नियम आहे.संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी!’ तोच नियम पाळण्याचे काम रोखठोक सडेतोडपणे करीत आहे. त्यात तडजोड होणे अशक्यच. वृत्तांकनाच्या या वाटचालीत अनावधानाने कोणाबद्दल चुकीचे वक्तव्य, लेखन केले गेले असे वाटत असेल तर त्याबददल रोखठोक आपल्या प्रवासातील एक सदस्य या नात्याने नक्कीच आपली दिलगिरी व्यक्त करीत आहे.
चांगल्या कामांना प्रसिद्धी देत चुकीच्या कामांवर अंकुश ठेवण्याचे काम आज रोखठोक करीत आहे. रोखठोकने दाखविलेल्या बातमींची तात्काळ दखल घेतली जाते. त्यामुळे अनेकांचा कल आज रोखठोककडेच आहे. हाच विश्वास कायम जोपासत पत्रकारितेचे व्रत पुढील काळात जोपासण्याचे काम आम्ही करणार आहोत.येणाऱ्या काळात सामाजिक, राजकीय व अन्य साऱ्या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडीची दखल तिसरा डोळा या नात्याने रोखठोकपणे तितक्याच तत्परतेने घेईल यात शंका नाही. सरत्या वर्षांप्रमाणेच येणारे वर्षही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय धामधूम अनुभवायला मिळणार आहे. याही काळात राजकारणाबरोबरचं वेगवेगळे विषय हाताळताना आम्ही आपले विश्वसनीय सोबती बनून राहणार आहोत.
भुतकाळातील अनुभव पाठीशी घेवून भविष्याचा अचूक वेध घेण्याचे काम रोखठोकने सातत्याने केले आहे. त्यात आपल्या सर्वांचीही मोलाची साथ आम्हाला मिळालेली आहे.आजवरच्या या रोखठोकच्या यशामागे लाखो वाचक आणि दर्षकांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे आजवर आपण दिलेले प्रेम आणि दाखविलेला विश्वास, केलेले मार्गदर्शन यापुढील काळात देखील असेच निरंतर राहील यात शंका नाही.