एकेकाळी पुणे शहरालगत सर्वात जवळचा तालुका आता झपाटयाने बदलतो आहे. आगामी काळात तो अजून झपाट्याने बदलेल. जागतिकीकरणामुळे उरल्या सुरल्या मुळशीचा ग्रामीण पणा जावून त्याचं शहरीकरण होईल. जुन्या आणि नवीन अशा समस्सा एकत्रितपणे समोर येतील. वाढता भौतिक विकास, वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढती आव्हानं आणि संधी हातात हात घालून आपल्यासमोर उभी असणार आहेत. त्या आव्हानांच आणि संधीचं सोनं करायच कि बदलणाऱ्या परिस्थितीबरोबर आणि येनाऱ्या समस्यांना शरण जावून आपण वाहवत जायचं हे आपल्यालाचं ठरवून घ्यावं लागणार आहे……
स्वर्ग सौंदर्यालाही भुरळ पाडणारा. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेला. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला. बारा मावळापैकी एक मावळ म्हणून ओळख असलेला. कणखर, लढाऊ व स्वराज्याच्या लढ्यात छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढनाऱ्या शूर वीर मर्द मावळ्यांचा मुळशी. भारतीय स्वातंत्र्य लढा असो की, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो यात हिरीरीने भाग घेणारया स्वातंत्र्य सेनानीचा मुळशी. आपल्या हक्काच्या जमिनी कोण्या एका उद्योगपतींच्या घशात जाऊ नयेत यासाठी जमिनी बचावासाठी टाटाच्या विरोधात सत्याग्रहाचा लढा उभा करणाऱ्या सत्याग्रहींचा मुळशी. लाल मातीत शड्डू ठोकून अवघ्या पंचक्रोशीला जागा करणाऱ्या पैलवानाचा मुळशी. आणि असा जगावेगळा असलेला कालचा मुळशी आज मात्र खूप बदलला आहे. बदलतो आहे. आधुनिक काळात विविध कारणामुळे तो अवघ्या जगाला आकर्षितही करून घेतो आहे पण…..
जुन्याचं नवं होताना
मधल्या काळात हिंजवडीच आयटीपार्क झालं. आणि एका क्लिकने मुळशीने आपला जुना बाज बाजूला ठेवत नवीन आधुनिकतेचं रूपडं धारण केलं. वर्षातून एकदा भरणाऱ्या ग्रामदैवत म्हातोबाच्या यात्रेमुळे हे हिंजवडी गाव आहे याच्या स्मृती काहीप्रमाणात जागविल्या जातात. अशीच काहीशी अवस्था कमी जास्स्त प्रमाणात पूर्व पट्ट्यातील अन्य गावांची झालेली आहे. अलीकडील काळात गावपणाचा तोही प्रशासकीय अधिकार काही मोठी गावं गमावून बसताहेत. शहरालगतची मोठी गावं महानगरलिकेत गेली आणि आता त्याचं पुणं झालय. राहिलेल्या बाजूच्या गाववांनीही आपलं जून रूप बाजूला ठेवून साऱ्या अंगाने आधुनिकतेची कास धरायला सुरुवात केली आहे. खाण – पान, राहणीमानापासून ते अगदी नातीगोती आणि रीतीभातीदेखील बदलताना दिसताहेत. सर्वागाने बदल होत असताना गेल्या दहा- पंधरा वर्षात खेड्याचं कधी शहर झालं ते आपल्याला कळालं देखील नाही. पूर्वी भाद्रपद महिन्यात गावागावात होणारा काकड आरतीचा स्वर आता गाभाऱ्यात कोंडला जाताना दिसतो आहे. रात्रीचे कीर्तन आणि जागर राजकारणाची प्रचाराची ठिकाण बनू पाहताहेत. देवाच्या भजनापेक्षा हारतुरे देवून मान सन्मान करण्यात भक्तांना अधिक स्वारस्य वाटू लागलं आहे.
सहारा, लवासा यारखी गोंडस नाव धारण करून आलेल्या शेकडो बिल्डरांनी स्थानिक गुंड, आत्ममग्म राजकारणी आणि कमिशनला लाचावलेल्या एजंटांच्या मदतीने गावच्या गाव विकत घेतली. डोंगरांचा ताबा घेवून ते खिळखिळे केले. शहरीकरणाच्या आणि शहरवासियांची हौस भागविण्यासाठी रातोरात सिमेंटची जंगल उभी केली. रान पक्षांची किलबिल आणि कोकिळेच्या मंजुळ स्वरात साखर झोप घेणाऱ्या गावकऱ्यांची रिसॉर्ट मध्ये रात्रभर वाजणाऱ्या डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे कायमची झोपमोड केली. रस्त्यावरून अल्पवयीन तरुण-तरुणीच्या झुंडी पर्यटनाच्या नावाखाली मुक्तपणे संचार करताहेत. त्याच रस्त्यावरून शाळेला येजा करणारी आमची लहानगी ते निरागसपणे पाहताहेत. त्यांच अनुकरण आपणही करायला हवं. आपल्यालाही असं मुक्तपणे जगता यायला हवं हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून जातो आहे. काही प्रमाणात त्याचं अनुकरण सुरु झाल्याने एकेकाळी सुसंस्कृत असलेल्या खेड्यापाड्यात आता नवी पिढी बिघडण्याची समस्या निर्माण होऊन त्यातून समाजासमोर व पालकांसमोर नवे प्रश्न उभे राहताना दिसताहेत.
हिरव्यागार भात खाचराच्या जागी धडधडणारया यंत्राचे कारखाने आणि सिमेंटची जंगल उभी राहिली. पाणंद रस्स्याचे राज्य महामार्ग बनले. गोकुळातली सावळी सांज बघता बघता लुप्त झाली. शेतात चरून तृप्त होणारी गुर अचानक कमी झाली. गायी गुरांच्या खुरांनी धूळ उडवीत लाल मातीत माखणारे रस्ते आता धूर आणि पांढऱ्या धुळीने प्रदूषित झाले. गायी म्हशीच्या गोठ्याच्या जागी देशी विदेशी मद्यांचे बार आले. एकदंरीत मुळशीच गावपण जावून आता शहरपण आलय. खरतर हा एकूणच सारा संक्रमणाचा कालावधी आहे.
वरवर बदलणाऱ्या, सुख सोयी येताहेत असं वाटणाऱ्या मुळशीच्या समोर समस्यांचा डोंगर उभा राहतो आहे हे विसरून चालणार नाही. वाडवडिलांनी मोठ्या कष्टानी टिकवलेल्या आणि पिकवलेल्या जमिनी एका सहीच्या फटकाऱ्याने नवीपिढी डेव्हलपमेंटच्या नावाखाली जाणते आणि अजाणतेपणे बिल्डरांच्या घशात घालते आहे. त्यातून अवेळी हाती आलेला पैंसा अनेकांना चैनीचा मार्ग निवडण्यास भाग पाडतो आहे. काही प्रमाणात गुन्हेगारीकडेही घेवून जातो आहे. अर्थात यालाही काहीजण अपवाद असतील. आलेला पैसा अन्य उद्योग व्यवसायात गुंतवणारी काही मित्रमंडळी समोर येते आहे. त्याचे प्रमाण मात्र अतिशय नगण्य आहे. मुळशी पॅटर्न सारख्या चित्रपटाने काहीप्रमाणात या परिस्थितीवर अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण जिथं आभाळच फाटलय तर तिथं शिवणार कुठे कुठे ?
हवेत विरघळणाऱ्या घोषणा आणि कागदावरचा विकास
बदलणाऱ्या काळात बदलणाऱ्या मुळशीसमोर अनेक समस्मा तोंड वासून उभ्या आहेत. वर्षानुवर्षे रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण शिक्षण या मुलभूत समस्या आणि त्याचबरोबर फोफावणारी गुन्हेगारी, सामान्य नागरिकांना वेठीला धरणारा प्रशासनातला वेळकाढूपणा, कमालीचा बोकाळलेला
भ्रष्टाचार, नागरिकांची सुरक्षा, अपुऱ्या रस्त्यामुळे नित्याची होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात या समस्यांबाबत विचार करताना समस्यांची, प्रश्नांची जाण असणारी मंडळी, समाज हिताचा, नव्या पिढीच्या भवितव्याचा विचार करताना चिंता व्यक्त करताना दिसते आहे. काय होणार मुळशीचं ? हा प्रश्न जाणकारांना सतावतो आहे. हीच परिस्थिती पुणे शहरालगतच्या जवळच्या अन्य तालुक्यांची असणार आहे. मात्र याबाबत उघडपणाने फारसं कोणी बोलताना दिसत नाही. तोंड दाबून बुक्यांचा मारखाण्याची आम्हाला आता सवय झाली आहे.
शासन – प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या माध्यमाने करण्यात आलेल्या घोषणांच्या आधारे गावोगावची राजकीय पुढारी मंडळी त्याचं भांडवल करून सामान्य मुळशीकराला केवळ झुलवत ठेवताहेत. वास्सवात सरकारने केलेल्या घोषणा, प्रशासनाने मांडलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सुख सोयी यांचा कुठेच मेळ बसताना दिसत नाही.
गावच्या अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. गावच्या दवाखान्यात पुरेसे डॉक्टर नाहीत. आहेत त्यांची काम करण्याची मानसिकता नाही तीच अवस्था पशुवैद्यकीय दवाखान्याची आणि तीच अवस्था शेती, माती आणि पाणी विभागाची. अलीकडील काळात पीएमआरडीएच्या विकास आराखड्याची आशा दाखवून विकासचं गाजर दाखवलं जातय पण प्रत्यक्षात कुठे काही ठोस होताना दिसत नाही. कोट्यावधीच्या आकड्यांच्या घोषणा हवेत आणि थोड्याफार कुणाच्या तरी खिशात विरताना दिसताहेत. गावोगावचे खड्ड्यांनी आणि चिखलानी माखलेले रस्ते मात्र वर्षानुवर्षे तसेच आहेत.
नव्या पिढीची नवी आशा
माझं म्हणनं कदाचित कोणाला पचणार नाही पण जे सत्य आहे ते सत्य म्हणून स्विकाराव लागणार आहे. या साऱ्या प्रश्नाची खऱ्या अर्थाने उकल व्हायची असेल. समोर दिसणाऱ्या आणि येणाऱ्या समस्यांना सोडवायचं असेल तर मुळशीकराना कोणाला तरी आपला नेता म्हणून पुढ आणावं लागणार आहे. कारण बारामती आणि मुळशी यातलं भौतिक अंतर पहाता खासदारांना मुळशी साठी देता येणारा न्याय आणि भोर आणि मुळशी यामधलं आत्मीयतेच नातं पाहता भोरकर हेही हवा तो न्याय मुळशीकरांना देताहेत असं होत नाही ही सामान्य मुळशी करांच्या मनातली खदखद आहे. मामासाहेब मोहोळ, नानासाहेब नवले यांच्यानंतर त्यांच्या ताकतीचे नेते मुळशीत पुढे आले नाहीत. कोणी पुढे येवू पाहत असेल तर मुळशीकर नागरिक त्याला पुढे येवू देत नाहीत ही शोकांतिका आहे.
अस सार काही चिंताजनक असलं, वाटलं तरी या समस्यांमधून उत्तर शोधण्यासाठी नवी पिढी काही प्रमाणात पुढे येताना दिसते आहे. त्यामध्ये बँकिग क्षेत्रातली चांगल्या पगाराची नौकरी सोडून एका फार्मर्स कंपनीच्या माध्यमाने शेतकऱ्यासाठी काम करणारे हनुमंत चोंधे, प्रशासनात जावून परिवर्तन घडवू पाहणारा नव्याने तहसीलदार पदी निवडला गेलेला नानेगावचा अजित गायकवाड, क्रीडा क्षेत्रात मूळशीची ओळख जगाला करून देणारी भूगावची कन्या चोंदे, एवरेस्ट्वीर भगवान चवले हजारो किल्ले पादाक्रांत करणारे मारुती आबा गोळे यांच्यासारखे अनेक तरुण- तरुणी आपापल्या क्षेत्रात यश संपादन करून नव्या पिढीला दिशा दर्शन करताहेत ही कौतुकाची बाब आहे. हे प्रमाण अजून वाढण्याची गरज आहे. मुळशीकरांच्याप्रति आत्मीयता असलेलं, प्रश्नांची जाण असलेलं एकतरी प्रभावी नेतृत्व भविष्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात उदयाला येईल. तेच सर्वाना पुढे घेवून जाईल. समस्येच्या गर्तेत अडकलेल्या मुळशीला बाहेर काढेल हीचं नव्या पिढीची माफक आशा आणि अपेक्षा आहे.
प्रदीप पाटील, मुळशी पुणे
(लेखक सामाजिक प्रश्नाचे अभ्यासक आहेत.)